Sunday, February 3, 2013

एअर पोर्ट


मार्च २७ , १९९२ ! माझा पहिला परदेश प्रवास ! अरुणच्या नोकरीच्या निमित्ताने आम्ही भारत सोडून निघालो होतो परदेशी वास्तव्यासाठी . उत्सुकता , काळजी , थोडी भीती आणि खूप सारा आनंद होता या प्रवासात . ९ तासांचा विमानप्रवास – तोही पहिल्यांदाच केलेला !पहिल्यांदाच झालेले आकाशातून मुंबापुरीचे आणि भारताचे रम्य दर्शन. आणि मग आकाशातून – ढगांतून केलेला मुक्त प्रवास !मी जणू तरंगत होते- मंतरलेल्या जगात !
हिथ्रो !जगातला सर्वात मोठा एअरपोर्ट ! हिथ्रो ला पाहिलं landing. सुंदर – सुखद हवा – हलकी पावसाची भुरभूर . तिथून Gatwick एअरपोर्ट ला पुढच्या विमान प्रवासासाठी जायचे होते – त्रिनिदाद- West Indies ला . Gatwick एअरपोर्ट वर मी लाउंज मध्ये बसले होते. अरुण कॉफी आणण्यासाठी गेला होता. तेवढ्यात माझ्याजवळ साधारण ६० वर्षे वयाची एक सुंदर अमेरिकन स्त्री येऊन बसली .तिने चटकन पर्समधून एक पुस्तक काढले व वाचू लागली . मी एअरपोर्ट वरच्या बाकी प्रवाशांकडे पाहत कोण –कुठल्या देशाचे असतील याचा अंदाज घेत होते.
एवढ्यात तिने माझ्याकडे निरखून पाहिले आणि म्हणाली ,”you are Indian !” मी म्हटल हो, आणि तुम्ही कुठच्या ? “अमेरिकेची” हे बोलाताबोलातच तिने तिच्या हातातले पुस्तक मला दाखवले ! भगवद्गीता ! गीतेचे संस्कृत श्लोक आणि खाली इंग्रजीत भाषांतर . मी आश्चर्यचकित झाले .तोच ती सांगू लागली ,” मी गेली ५ 1/२ वर्षे हिमालयात राहत होते .तेथे एका गुरूंकडे ( नाव माझ्या लक्षात नाही ,पण ती अतिशय आदराने त्यांचा उल्लेख करत होती .) शिकले . मी रोज भगवद्गीता वाचते .आता अमेरिकेला जायला निघाले आहे. मग व्यास लिखित महाभारतातील भगवद्गीतेवर आम्ही चर्चा केली. एम ए ला नुकताच ज्ञानेश्वरीचा अभ्यास झाला असल्याने आणि लहानपणापासून काही अध्यायांचे नियमित पठन असल्याने चर्चा रंगली . एका तासाने तिच्या flight ची announcement झाल्यावर ती निघाली ,तेंव्हा तिच्या डोळ्यात आनंद होता , "भारताबाहेर एक 'तिची 'भारतीय भेटल्याचा." पुन्हा पुन्हा माझा हात हाती घेऊन ती तो आनंद व्यक्त करत होती !आणि मी – आपला भारत सोडून जाताना पहिल्याच विमान तळावर तिला भेटले होते , जिने मला –माझ्या भारताला आधीच आपलसं केल होतं ! नव्या जगानी केलेलं माझं पहिलं स्वागत , भारतीयत्वाचा सन्मान आणि आपलेपणा यांनी मी भारावून गेले .
british airways ने आम्ही त्रिनिदाद ला पोहोचलो. तिथे भारतीय असल्याने अतिशय आदराने व प्रेमाने आम्हाला रिसीव्ह केले गेले. बाहेरच्या बाजूला आल्यावर एकजण ( जो बर्याच अंशी भारतीय असावा असे वाटले ) आमच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, “तुम्ही सुनील गावस्कर च्या देशातले –भारतातले न? आम्हाला सुनील गावस्करचा खेळ अतिशय आवडतो . सुनील गावस्कर सार्या वेस्ट इंडिअन्स चा अतिशय आवडता खेळाडू आहे!”
भारता बाहेर पडताना नव्या जगाशी- नव्या देशाशी आपल्याला जुळवून घ्यायचे आहे . कशी असतील अनोळखी देशातली माणसे ? कसे जमेल आपल्याला तिथे राहणे ? नाना अडचणी असतील –अशा अनेक शंका ! आणि एअरपोर्ट वरच सारे त्रिनिदादच जणू आपले –सुनील गावस्करच्या देशातल्या व्यक्तींचे –केवढ्या आपुलकीने , प्रेमाने स्वागत करत आहे, असा अनुभव !
पुढे साडेतीन वर्षांचे आमचे तिथले वास्तव्य अनेक अर्थांनी संस्मरणीय झाले . तिथल्या लोकांशी – मातीशी - सौहार्दाचे संबंध जुळले .तिथल्या सुंदर बीचेस वर अनेक ट्रिप्स-पिकनिक्स –झाल्या .वर्षातले १२ ही महिने हिरव्या असणाऱ्या झाडांचा हा देश आमच्या मनामध्ये कायमचा वस्तीला आला. निघताना आमच्या एका स्नेह्यांच्या वडिलांनी आम्हाला आशीर्वाद देताना म्हटले होते,”वेस्ट इंडीज चे बेस्ट इंडीज करून या “ तो आशीर्वाद फळाला आला !

No comments:

Post a Comment