Wednesday, February 20, 2013

मला भेटलेल्या कविता – ३



हळुवारपणे उतरते प्रेम-कविता निकिता स्तनेस्कूच्यi लेखणीतून..
जितका बुद्धिमान, तितकंच संवेदनशील मन ! सहज-सहज त्याची कविता ओघळते ...अर्थ होऊन.
रोमानियन भाषेमध्ये त्याच्या कवितेला एक नकळत असलेली लय आहे,
भाषांतरात त्याचं सौंदर्य नाही उतरता येत...
कारण शब्दशः अनुवादात अर्थाची तरलता हरवून जाते
म्हणून स्वैर अनुवादाच निदान थोड्या फार प्रमाणात
मूळ कवितेशी समांतर जात राहतो , असं मला वाटतं !
निकिता स्तनेस्कूच्या काही प्रेम कवितांचा आस्वाद घेऊ या..

एका गुरुवारी...प्रेमपूर्वक

संध्याकाळी एका गुरुवारी ,संध्याकाळी हृदय-भरल्या
जेव्हा संचित बहरलं होतं
वसंत-ऋतूतल्या तृणासारखं

मी प्रेम केलं तुझ्यावर
इतकं, कि विसरलो तुला...
वाटलं, माझाच आहेस तू एक भाग !

अन तेंव्हा चकित झालो
मी हसलो होतो, पण तू ..
नाही हसलीस

जेंव्हा झाडांची पानं हलकेच खुडली मी
अन तू..
त्यांखालीच रेंगाळलीस , जरा जास्त ....

अन त्या क्षणी
उमजलं ,
कि तू होतीस कुणीतरी वेगळी
पण फक्त तशी, जसा –
संध्याकाळचा सूर्य असतो वेगळा –
........चंद्र !!!

2 comments:

  1. उज्ज्वला,
    वाचतेय एकेक करुन. रोमनियन स्क्रिप्ट टाक ना मराठीत लिहून(कठीण असेल तर राहूच दे). तेव्ह्ढीच मजा वाचताना आणि वाचलेलं मनातल्या मनात ऐकताना.
    बाय द वे, हे निकिता स्तनेस्कू (मी निकीता ख्रुश्चेव्ह पुरुष होते हे ज्ञान जमेस धरुन बोलतेय)आपले रोमानियन बापट कि़वा खरे वाटयायेत नाही?

    ReplyDelete
  2. रोमानियन स्क्रिप्ट मराठीत लिहिण्याची कल्पना फार सुंदर . नक्की लिहून पोस्ट करीन श्रद्धा .निकिता स्तनेस्कूची आेळख पुढच्या पोस्ट मधे करून देणार आहे . तुला आवडेल .

    ReplyDelete