Wednesday, February 20, 2013

मला भेटलेल्या कविता – ३



हळुवारपणे उतरते प्रेम-कविता निकिता स्तनेस्कूच्यi लेखणीतून..
जितका बुद्धिमान, तितकंच संवेदनशील मन ! सहज-सहज त्याची कविता ओघळते ...अर्थ होऊन.
रोमानियन भाषेमध्ये त्याच्या कवितेला एक नकळत असलेली लय आहे,
भाषांतरात त्याचं सौंदर्य नाही उतरता येत...
कारण शब्दशः अनुवादात अर्थाची तरलता हरवून जाते
म्हणून स्वैर अनुवादाच निदान थोड्या फार प्रमाणात
मूळ कवितेशी समांतर जात राहतो , असं मला वाटतं !
निकिता स्तनेस्कूच्या काही प्रेम कवितांचा आस्वाद घेऊ या..

एका गुरुवारी...प्रेमपूर्वक

संध्याकाळी एका गुरुवारी ,संध्याकाळी हृदय-भरल्या
जेव्हा संचित बहरलं होतं
वसंत-ऋतूतल्या तृणासारखं

मी प्रेम केलं तुझ्यावर
इतकं, कि विसरलो तुला...
वाटलं, माझाच आहेस तू एक भाग !

अन तेंव्हा चकित झालो
मी हसलो होतो, पण तू ..
नाही हसलीस

जेंव्हा झाडांची पानं हलकेच खुडली मी
अन तू..
त्यांखालीच रेंगाळलीस , जरा जास्त ....

अन त्या क्षणी
उमजलं ,
कि तू होतीस कुणीतरी वेगळी
पण फक्त तशी, जसा –
संध्याकाळचा सूर्य असतो वेगळा –
........चंद्र !!!

Tuesday, February 19, 2013

रोमानियन कविता आणि मी....

रोमानियाला राहायला गेले, आणि तिथल्या गलात्स या छोट्या शहरात मला ती भेटली ! नव्या देशात राहायला गेलं म्हणजे पहिल्यांदा तिथली भाषा निदान जरुरी पुरती शिकणं आलंच !
आणि केवळ या कारणासाठीच तिची माझी भेट होणं अपरिहार्य होतं ! ती रोमानियन भाषेचे धडे देण्यासाठी माझ्या घरी आली. सुंदर बांधा, सुरेख लालसर गोरा रंग आणि एखाद्या लहानशा.. उत्सुक मुलीचे असावेत असे विलक्षण बोलके डोळे ! मी क्षणभर पहातच राहिले. बोलण्या वागण्यातली अदब आणि आत्मविश्वास मला आवडून गेला. हातात हात घेत आम्ही एकमेकींची ओळख करून घेतली.
‘मी तमारा.’ ‘मी उज्ज्वला.’
‘तुझ्या नवर्यालाही मीच रोमानियन भाषा शिकवली.’ ती म्हणाली आणि हसली.
फारतर १८-२० वर्षाचं वय असणारी तमारा शिक्षिकेच काम करते, म्हणजे लहानपणापासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असावी, मी मनात म्हटलं. अरुण आधीच रोमानियात राहायला आला असल्याने त्याचं रोमानियन शिकून झालं होतं ..अर्थात जरुरीपुरतं. कारण ऑफिस च्या कामासाठी दुभाषिकांची सोय असते.
मी चैतन्याची ओळख करून देत म्हटलं, “ही ११ वीत आहे. बुखारेस्ट च्या आंतरराष्ट्रीय शाळेत.” ती म्हणाली ,”तर मग चैतन्या, तुला तिथे रोमानियन विद्यार्थी-विद्यार्थिनी देखील भेटतील.आणि रोमानियन भाषा शिकण्याचा लगेच उपयोग करता येईल.”
तिने गप्पांच्या ओघात मला एका ६-७ वर्षांच्या मुलाचा फोटो दाखवत म्हटलं, “हा माझा मुलगा, डेव्हिड.”
मी आश्चर्याने चकितच झाले ! मग मात्र मी तिच्या शिक्षणाबद्दल चवकशी केली.फ्रेंच आणि इंग्रजी भाषेत post graduation झालेली तमारा प्रबंधाचा विषय कोणता घ्यायचा याचा विचार करत होती.

फ्रेंच आणि spanish भाषेचा प्रभाव असलेली रोमानियन भाषा शिकताना तमाराची आणि माझी छान मैत्रीच होऊन गेली !
जुजबी भाषा शिकून मी आणि चैतन्या बुखारेस्टला राहायला गेलो. त्यानंतर काही महिन्यांनी हळू हळू या नव्या देशाबद्दल माहिती करून घेण्याची उत्सुकता आणि त्यानंतर रोमानियन साहित्याचा विशेषतः कवितांचा अभ्यास करावा असा विचार मनात आला आणि मार्गदर्शक म्हणून तमाराची मदत घेता येईल असे लक्षात आले, कारण भाषा शिकताना सहजच तिच्या बोलण्यात कवितेमध्ये या आशयाचा वेगळा शब्द वापरला जातो असा जाता जाता उल्लेख असे.

तिच्यापाशी कवितांचा विषय काढला मात्र ! ती खुशच होऊन गेली अगदी ! संवेदनशील तमारालाही कवितांचं खूप प्रेम .मग आम्ही ठरवलं, कि काही ४-५ रोमानियन कवींच्या थोड्या थोड्या कविता आम्ही अभ्यासायच्या आणि त्यातून मला जो कवी जास्त भावेल , त्याच्या कविता नंतर अभ्यासायच्या.
यानंतर एक एक कविता घेऊन त्याचे इंग्रजीत ती विवेचन करी आणि रोमानियन शब्दांचा, वाक्प्रचारांचा त्या संदर्भात अर्थ. नव्या देशाची कविता शिकताना त्या देशातील चालीरीती, कधी सण – उत्सव ,रूढी परंपरा, समजुती आणि अशा अनेक पदारांबद्दल चर्चा चालू झाली आणि खर्या अर्थाने मी रोमानियाला समजून घेऊ लागले !

मिहाई एमिनेस्कु , जाॅर्ज बकोविया , निकिता स्तनेस्कू आदी कवींच्या कविता वाचताना निकिताची कविता वाचली semn -1 (खुण -1) नावाची .आणि त्याच्याच आणखी कविता वाचताना मनानी ग्वाही दिली. यापुढे जास्त करून निकिता स्तनेस्कू चा अभ्यास करायचा म्हणून !
हा अभ्यास आता चालू झालाय ,त्याच्या काही कविता आणि इतरही काही कवींच्या कविता तुमच्या भेटीला घेऊन येतेय !

या कवितांबरोबरच तमाराच्या आणि माझ्या नात्याचा प्रवास रोमानियन भाषेची विद्यार्थिनी- शिक्षिका पासून मैत्रिणी आणि नंतर जीवश्च कंठश्च मैत्रिणी इथपर्यंत झाला .

अधून मधून तिलाही तुमच्या भेटीला घेऊन येईन हे नक्की !

Monday, February 18, 2013

मला भेटलेल्या कविता : 1

1 . Joc cu avioane

Era un joc rotund de avioane:
unele erau aurii,
altele argintii.

Uite-așa: o jumătate de cerc,
de la stânga, sus,
până jos, lângă acoperișe
… și apoi până sus, la dreapta,
aurii, argintii.

Cum se mai rostogoleau
aurii, argintii…

După-aceea a pierit casa vecinului
și casa din colț
și casa de-alături…

Și eu, de mirare,
clătinam din cap:
uite, nu mai e o casă!…
uite, nu mai e o casă!…
uite, nu mai e o casă!…


१  जॉक कु आव्हिओआने

येरा उन जॉक रोतुन्द दि आव्हिओआने
उनेले येराउ आउरि ,
आल्तेले आर्जिंती.

उइता-शा ओ जुमातते दे चेर्क
दे ला स्तन्गा सुस
पुन जॉस लँगा आकोपेरिशे
शी अपोई पुन सुस , ला द्र्याप्ता ,
आउरि , आर्जिंती .

कुमसे माई रोस्तो गोल्याउ
आउरि आर्जिंती.

दुप च्ये आ पियरित कासा वेचिनुलुइ
शी कासा दिन कोल्ट
शी कासा दे अल्तुरि....

शी येउ दे मिरारे
क्लातिनाम  दिन काप
युइते नु माई अकासा!
 युइते  नु माई अकासा !
युइते नु माइ अकासा !


1. विमानांचा खेळ

ते नृत्य वर्तुळान्मधून पुढे सरकत होतं – विमानांमधून :
काही सोनेरी ,
काही रुपेरी.
ती फिरत होती : अर्धवर्तुळात
डावीकडे, वर जात ,
मग खाली येत , छपरांवरून
......नंतर वर , उजवीकडे
सोनेरी , रुपेरी .

कशी गिरक्या घेत होती ,पडताना
सोनेरी , रुपेरी.....

त्यानंतर एका शेजार्याचे घर मृत्यू पावले.
मग कोपर्यावरचे घर
आणि शेजार्यांचे घर

मी चकित झालो
आणि डोके हलवले
पहा, त्या तिकडे एकही घर नाही ......
पहा, या इकडे एकही घर नाही......
पहा ,इथे एकही घर नाही .....


एका लहान-८-९ वर्षाच्या मुलानी पाहिलेला आपल्याच गावावरील बॉम्ब हल्ला !
जणू विमानांचा चाललाय खेळ ! विमानं गोल- अर्धगोलाकार वर्तुळातून वर खाली, डावी- उजवीकडे झेपावताहेत आणि त्यांच्यामधून पडताहेत खाली सोनेरी-रुपेरी (बॉम्बज) पण या छोट्या मुलाला बॉंम्बज म्हणजे काय कुठे कळतंय ! त्याला जणू आतीशबाजीचा खेळच वाटतो आहे ! आणि जेव्हा घरे नाहीशी होताना दिसतात, तेंव्हा मात्र ते दारूण सत्य त्याला जाणवतं ! घर मृत्युमुखी पडलंय , तो म्हणतो ! घर म्हणजे घराचं एक जिवंत अस्तित्व, त्यातली माणसे, त्या छोट्याचे त्यात राहणारे मित्र-मैत्रिणी- घरातली मांजर, कुत्रा आणि आणखीही पाळीव प्राणी...
आत्ता ही सारी माझ्या ओळखीची घरं होती, आणि आता इथे काहीच राहिलं नाही !!!
कवी निकिता स्तनेस्कू १९३३ मध्ये जन्मला आणि काही वर्षातच दुसर्या महायुद्धाने रोमानियातले जनसामान्यांचे जीवन उद्ध्वस्त केले....


मला भेटलेल्या कविता : 2

रोमानियाचा अत्यंत लाडका contemporary कवि निकिता स्तनेस्कू - 20 व्या शतकातील महत्वाचा कवि !
1933 मधे जन्मला आणि अतिशय लहान वयाचा - दुसर्या महायुद्धात जर्जर झालेल्या रोमानियाचा - अत्यंत संवेदनशील साक्शीदार !
महायुद्धाच्या काळात रोमानियावर झालेल्या हवाई हल्ल्यावरची ही त्याची अतिशय बोलकी कविता -

2. Sfârşit de bombardament

Ai scăpat creta din mână
și ușa bătută în scânduri s-a dat de perete:

cerul s-a arătat, pieziș,
acoperit de paianjeni
care mâncau copiii uciși.

Cineva ți-a dus departe
zidurile
și gutuiul
și scara.

Tu pândeai primăvara
nerăbdător, cum aștepți
o eclipsă de lună.

Către zori ți-au dus departe
și gardul
pe care-l însemnai cu o dungă,

să nu cumva să rătăcească berzele,
când vor veni,
primăvara….


2. एका हवाई हल्ल्याचा शेवट

तू तुझा खडू खाली टाकलास
आणि भग्न दरवाजा भिंतीवर धडकला

आभाळाचा काही भाग झाकोळला होता
कोळ्यांच्या जाळ्यानी.
मुलांच्या खुनांवर पोसलेल्या

कुणीतरी घेऊन गेल होतं
भिंती
फळझाड
आणि जिने .

वसंत ऋतूमागे तू शोधत होतास
अधीरपणे ,जशी काही तुला अपेक्षा होती
चंद्र ग्रहणाची .

पहाटेपर्यंत ते घेऊन गेले
कुंपण सुद्धा
ज्यावर तू सही खरडली होतीस ,

करकोचांनी रस्ता चुकू नये म्हणून
पुन्हा परतताना
वसंत ऋतूत .


बाँबस्फोटानंतर इतकं खिळखिळं झालं होतं दार, कि छोट्याशा खडूच्या खाली पडण्याच्या एवढ्याशा आवाजाने सुद्धा ते हललं आणि भिंतीवर आपटलं !

आभाळाकडे पहावं तर बरंचसं आभाळ झाकून गेलंय्, बाँबस्फोटानंतर आभाळात उडालेल्या काळ्या कणांनी....
पण ते कोळ्याच्या जाळ्यासारखे दिसतायत्...जर्मनी आणि रशिया यांच्यामधे महायुद्धाच्या जाळ्यात सापडलेल्या छोट्या रोमानियाची अवस्था कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या माशीसारखी झाली आहे !
अश्राप बालकांप्रमाणे रोमानियन लोकांचे या युद्धात बळी गेले आहेत.

वसंत ऋतूमागे तू शोधत होतास... ..शोधणे इथे hunt शिकार करणे या अर्थाने आलंय्, (pandeai) शिकार ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती. युद्ध संहारानंतर माणुसकी राहिली नाहीय् शिल्लक..सर्वस्व लुटल्या गेलेल्या प्राण्याची अस्तित्वासाठी धडपड फक्त..(basic instinct of an animal for survival)
जशी काही तुला अपेक्षा होती चंद्र ग्रहणाची ..जणू चंद्र ग्रहणानंतर पुन्हा आलेल्या प्रकाशात नवी सृष्टी दृष्टीपथात येणार आहे ! संपूर्ण अंधारानंतर पुन्हा नवी सुरुवात ! हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे जग थांबलेलं असतं.. जणू काही मृतवत झालेली सृष्टी वसंतात नव्याने जन्मते ..जणू आता इतक काही वाईट होऊन गेलेलं आहे कि फक्त आणि फक्त चांगलंच होणार हा ईश्वराची संदेश आहे. कारण चंद्रग्रहण रोमानियन संस्कृतीत अशी घटना मानली गेलंय कि त्या माध्यमातून तुम्हाला काही ईश्वरी संदेश मिळत असतो .ज्यानंतर खूप चांगलं घडतं काहीतरी किंवा खूप वाईट..आपणही म्हणतोच की - चंद्रग्रहणानंतर काहीतरी वाईट घडणारेय् किंवा कधी काहीतरी खूप चांगलं..
पण सुरक्षेसाठी असलेलं ..राहिलेलं शेवटचं कुंपण..तेही पहाटेपर्यंत हिरावून घेतलं गेलं होतं ..
घरातल्या – कुटुंबातल्या लोकांच छप्पर तर गेलच ..पण वसंत ऋतूत स्थलांतर करून येणाऱ्या करकोच्यांचं घरटंही ! स्थलांतरित पक्षी पुन्हा पूर्वी बांधलेल्या घरट्यातच राहायला येतात...
...त्यांना घराची खुण म्हणून खरडलेल्या सही सकट कुंपणही युद्धानी लुटलं .... |

Wednesday, February 13, 2013

रोमानियन स्त्रीचे जागतिक स्तरावरील स्थान :2


१९५० ते १९८२ पर्यंतची आपली जगप्रसिद्ध कारकीर्द करणारी ‘व्हर्जिनिया झिआनी’ ही सोप्रोनो गायिका .’कमेंदेतोर of द इटालियन रिपब्लिक’ हे व इतरही अनेक जागतिक स्तरावरील बक्षिसे तिने मिळवली .रोमानियाच्या ‘किंग मिशेल’ ने ‘Nihil Sine Dio’ हा सर्वात मोठा खिताब तिला दिला . गलात्स ची ‘इलियाना कोत्रुबास’ या सोप्रनो गायिकेने १९६५ मध्ये नेदरलँड्स मधली ‘एस हरटोजेनबोश’ ही महत्वाची स्पर्धा जिंकली . अनेक गाणी गाऊनतिने जगभरात आपले नाव केले . तीमिश्वारा शहरातील आयोलंडा बलाश ऑलिम्पिक चम्पियन होती.’जगातील ६ फुटापेक्षा जास्त उंच उडी मारणारी’ ही पहिली स्त्री’ रोम मधील १९६० सालच्या ऑलिम्पिकमध्ये तिने २ गोल्ड्स मिळवली . १९५७ ते ६६ पर्यंत १५० स्पर्धा तिने जिंकल्या !
बुखारेस्त च्या ‘लिया मनोलिऊ’ ने थाळीफेक मध्ये ३ ऑलिम्पिक मिळवली. ३५ व्या वर्षी वाढलेल्या वयामुळे रोमानियन टीम मधून काढून टाकलेल्या ‘लिया’ ने स्वतः प्रक्टिस करून १९६८ मधल्या ऑलिम्पिक मध्ये गोल्ड पटकावले. पुढे १९९२ ते ९६ या काळात ती रोमनिअन सिनेट मेम्बर (लेजिस्लेचर) झाली. १९४८, ४९,५० ची टेनिस टूरनामेनटस ची टायटल्स घेणारी ‘व्हर्जिनिया रुझीची’, १९७८ ची फ्रेंच ओपन चेम्पियान्शीप तिनं मिळवली. १९७३ चं ऑस्कर पटकावणारी ‘आना असलान’ , जगप्रसिद्ध बायोफिजीसिस्ट ‘फ्लोरेन्तिना मोसोरा’ आणि अशा कितीतरी ! रोमानियाची अंतर्गत परिस्थिती प्रतिकूल असतानाचे रोमानियन स्त्रीचे हे यश अधिकच उठून दिसते !रोमानियाचा अध्यक्ष चाउशेस्कू असताना १९७७ ते १९८१ या काळात रोमानिया वर परदेशी कर्जांचा बोजा एकदम वाढला, तो तीन बिलियन अमेरिकन डॉलर्स वरून १० बिलियन अमेरिकन डॉलर्स वर गेला. चाउशेस्कूच्या स्वतंत्र धोरणांमुळे IMF (International Financial Organisation) व जागतिक बँक आणि चाउशेस्कू यांच्यातील संघर्ष वाढू लागला . यामुळे इतर कुठल्याही राष्ट्रांची मदत न घेता १९८९ पर्यंत चाउशेस्कूने रोमानियन जनतेवर अन्याय करत ह्या कर्जाची परतफेड केली. यासाठी अन्नधान्य आणि कारखान्यातील उत्पादने परस्पर निर्यात केली जाऊ लागली . जनतेच्या खाण्या-पिण्या वर निर्बंध लादले गेले.देशांतर्गत अर्थ व्यवस्था कोलमडली. या काळात रोमानियन स्त्री ला घराबाहेर पडून काम करावे लागले तरी घरातील तिची जबाबदारी घरच्या पुरुषाने वाटून घेतली नाही. युद्धकाळात लोकसंख्या कमी झाल्याने गर्भनिरोधाकांवर बंदी आली आणि संतती नियमन कायदा विरोधी मानले गेले.
या कम्युनिस्ट राज्यात प्रत्येक घराला एक छोटे कार्ड मिळे. त्यावर घरात रहाणार्या सदस्यांची नवे व वये लिहिलेली असत. आपल्या पैशानेच परंतु प्रत्येक व्यक्तीला अर्धा ब्रेड दिवसाला मिळे. व त्या कार्डावर त्या तारखेवर फुली मारली जाई. त्यानंतर त्या किंवा इतर कोणत्याही दुकानात पैसे असूनही ब्रेड विकत घेता येत नसे ! प्रत्येकाला एक ग्लास दुध मिळे .त्यासाठी दर रोज पहाटे तीन पासून रांगेत उभे राहा ! तुमचा नंबर आल्यावेळी तुम्ही हजार नसलात, तर तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला दुध मिळणार नाही. अशा रीतीने खाण्यापिण्यावर निर्बंध आणि संतती नियामानावर बंदी ! स्त्रिया भीतीने गुपचूप गर्भपात करवून घेत. त्या काळात तिला योग्य ते उपचार व औषधेही मिळवता येत नसत .कारण कुणाला कळून बातमी सरकारपर्यंत गेली तर कारावास ! समाजात ठीक ठिकाणी चाउशेस्कूचे खबरे असत. आपली जिवलग मैत्रीण किंवा शेजारीणही खबरी असण्याची शक्यता ! हे दडपण सतत असे. सारiच चोरीचा मामला ! त्यामुळे स्त्रिया व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण त्यावेळी रोमानियात इतर सर्व युरोपियन राष्ट्रांपेक्षा कितीतरी जास्त होते !१९८९ च्या डिसेंबर मध्ये रोमानियात रक्तरंजित क्रांती झाली. १९९० पर्यंत रोमानिया खर्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकले नाही. समुद्रातील एखाद्या छोट्या बेटाप्रमाणे इतर सर्व जगाशी संपर्क तुटलेल्या रोमानियाची कल्पनाही आपल्याला भयावह वाटते !
अर्थातच कम्युनिस्ट कंट्री असल्याने विशेष कौशल्य असणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षणाची , राहण्या खाण्याची काळजी घेणे व जागतिक पातळीवर त्यांना संधी देणे हे मोठे काम सरकारने केले हे उघडच आहे. पण देशातील हiलाखीच्या परिस्थितीमुळे खचून न जाता मेहनत व प्रयत्नातील सातत्य रोमानियन स्त्रीने सोडले नाही हे प्रकर्षाने जाणवते. १९८९ च्या क्रांतीनंतरही (युरोपियन कम्युनिस्ट देशांपैकी सर्वात पहिली क्रांती रोमानियात झाली आणि कम्युनिझमच्या सर्वात तीव्र झळाही रोमानियालाच लागल्या .)रोमानियन स्त्री घराबाहेर पडून काम करतच राहिली . आता तिच्या पुढे आदर्श होता पश्चिमी युरोपियन स्त्रीचा आणि अमेरिकन स्त्रीचा .आता रोमानियन स्त्रियांना जास्त हक्क मिळाले . गर्भापातावरील व गर्भनिरोधाकांवरील बंदी उठवली गेली . पूर्वी बाळंतपणासाठी फक्त ६० दिवस राजा मिळत असे, ती आता दोन वर्षांपर्यंत वाढवली गेली आहे आणि लहान मुलांच्या संगोपनासाठी ही राजा आई-वडील या दोहोंपैकी कुणालाही घेता येते.अर्थातच ज्याचा पगार कमी , त्याने ही राजा घ्यायची अशी विभागणी असते.
रोमानियन्स हे ओर्थोडोक्स ख्रिश्चन्स आहेत. आजही समाजामध्ये चर्चमध्ये जाऊन लग्न करणे हे महत्वाचे मानले जाते . या परंपराप्रिय समाजामध्ये लग्नसंस्थेबद्दल आदर आहे, कुटुंबव्यवस्थेवर विश्वास आहे. रोमानियन स्त्रीला आपलं घर आणि घरसंसार सांभाळण्याच आपलं कौशल्य यांचा अभिमान वाटतो. शहरी स्त्रिया पश्चिमी स्त्रियांप्रमाणे पेहेराव करतात तर खेड्यातील स्त्री पारंपारिक पेहेरावात दिसते . भौतिक गोष्टींपेक्षा नवर्याचे प्रेम व परस्पर विश्वास या गोष्टींना ती जास्त महत्व देते. सुंदर, सडपातळ व आपल्या दिसण्याविषयी विशेष काळजी घेणारी ही स्त्री चटकन नजरेत भरते. माणुसकी, धार्मिकता, दयाळूपणा या गुणांकडे ती सहज आकर्षित होते. शहरी स्त्री उद्योग-व्यवसाय , नोकरी यांकडे वळली आहे पण खेड्यातील स्त्रिया अजूनही नोकरीच्या अभावी घरकाम, शेतावर काम करणे व मुलांना वाढवणे अशी कामे करतात. एका मोठ्या international co. त ह्युमन रिसोर्सेस manager चे पद सांभाळणारी ‘नेल्या’ म्हणते,” शहरातील स्त्रिया मोठ्या प्रमाणावर managers म्हणून काम करतात. त्या उच्चशिक्षित असून ५ वर्षे जॉब केल्यावर नवीन चालेंजेसना सामोरे जाण्यासाठी नोकरी बदलण्याची तिची तयारी असते. बिझनेस असोसिएट, डायरेक्टर अशा मोठ्या पदावर असलेल्या स्त्रियांना पगार आणि इतर सवलती पुरुषांच्या बरोबरीने मिळतात.”
“पण ही समानता घरी आल्याबरोबर संपून जाते .” तमारा म्हणते. “बाहेर रोमानियन स्त्री पुरुषाच्या बरोबरीने काम करते. आणि घरी आल्यावर रोमानियन पुरुष चहा पीत वर्तमानपत्र वाचत बसतो.त्याला घरकाम करणे अपमानास्पद वाटते. स्त्रीला स्वैपाक, धुणीभांडी, स्वच्छता, मुलांचे अभ्यास घेणे हे सर्व एकटीला करावे लागते. थोडक्यात काय, स्त्रियांना घरच्या सर्व जबाबदार्या व व्यावसायिक जबाबदार्या अशी तारेवरची कसरत करावी लागते.
रोमानियन स्त्री तिची जिद्द, चिकाटी, मेहनती स्वभाव आणि जास्त तास थांबून काम करण्याची तयारी या गुणांमुळे नोकरीच्या जागी ओळखली जाते.परंतु नोकरीच्यi जागीसुद्धा खुपजण पारंपारिक विचारांचे असतात. त्यामुळे ‘ही कामे स्त्रियांची-ही कामे पुरुषांची हा भेद असतोच. यामुळे तिला हव्या त्या पद्धतीने करियर घडवता येत नाही . स्त्रीची योग्यता व पदव्या पुरुषाच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त असल्या तरी त्याच पदासाठी तिला तिची पात्रता सिद्ध करण्यासाठी जास्त तास थांबून कामे करावी लागतात. आणि पगार मिळताना मात्र त्याच पदावर काम करणाऱ्या पुरुषाला स्त्रीपेक्षा पुष्कळदा जास्त पगार मिळतो .” नेल्या म्हणते,”बाळंतपणासाठी इथे दोन वर्षेपर्यंत राजा मिळते, व त्यानंतर त्याच जागी , काम करण्याची संधीही . पण हीच संधी आम्हाला कामाच्या जागी दुय्यम स्थान देते.” फनिका (नाव बदलले आहे.) ही इंजिनियर म्हणून ज्या कंपनीत काम करत असे, ती कम्पनी बंद पडल्यामुळे बेरोजगार झाली. त्यानंतर तिने एका छोट्याशा गावी हॉटेल चालवले. रोमानिया हे युरोपियन युनियन मधील एक राष्ट्र . इथे बेरोजगार व्यक्तींना युरोपियन युनियन तर्फे व्यवसायासाठी कर्ज मिळते. फनिका स्वतः इंजिनियर असून, तिच्याकडे कल्पक योजना असूनही रोमानियन पारंपारिक विचारसरणीच्या आणि पुरुषसत्ताक पद्धतीच्या समाजात तिला या फंडासाठी स्वतः च्या नावात अर्ज करता आला नाही. कर्जासाठी तिला नवर्याच्या नावानेच अर्ज करावा लागला.
हे कमी आहे कि काय म्हणून इथे घरगुती अत्याचार ,विनयभंग, बलात्कार वगैरेंसाठी अजूनही स्त्रीच दोषी मानली जाते. परंपरेच्या जोखडात अडकलेली रोमानियन स्त्री आपल्या हक्कांसाठी व पुरुषांनी दिलेल्या अन्याय्य वागणुकीसाठी आवाज उठवत नाही. त्यांचा घरी अपमान होत असेल, नवर्याकडून मारहाण होत असेल तरीही त्या पोलिसात तक्रार नोंदवत नाहीत, एवढेच नवे, तर आपल्या मित्र-मैत्रिणीला वा परिवारालाही विश्वासात घेऊन या गोष्टी सांगत नाहीत कारण आपल्याला अशी वागणूक मिळते हे सांगायची त्यांना लाज वाटते.
२००३ मध्ये रोमानियात ‘द नेशनल ऑर्गनायझेशन ऑफ लिबरल वूमन’ ही संस्था स्थापन झाली. रोमानियाची ‘वूमन्स लीग’ म्हणते,’अस्तित्वाच्या या लढ्यात स्त्रियांना नगण्य स्थान आहे.’ लग्न झालेल्या स्त्रियांची गणना इथला कायदा लहान मुलांमध्ये करतो.या किंवा अशांसारख्या स्त्रीहक्कांसाठी लढा देणाऱ्या विनानफा तत्वावर चालणाऱ्या संस्था मदतीला तत्पर असूनही नवर्याविरुद्ध आवाज उठवणार्या महिलांचे प्रमाण केवळ ८-९% च आहे. काडीमोड दिली तर घर-दर जाईल,मालमत्तेची विभागणी होईल व नवीन घर घेणे किंवा भाड्याने घेणे,इतर बिले भागवणे, मुलांना सांभाळणे या सार्या गोष्टी आपल्या पगारात शक्य नाहीत असे ती म्हणते. कारण युरोप मधील आर्थिक संकटामुळे देश परिस्थितीच्या विळख्यात सापडलेला, अपुरे पगार !
इंटरनेशनल कंपनीत फायनान्स सेक्शन मध्ये काम करणारी ‘सोरीना’ म्हणते, “मुलीचे आईवडील तिला पाठींबा देण्यासाठी व आपल्या परीने मदतीसाठी तयार असतात. पण मुलगी या गोष्टी आई-वडिलांपर्यंत जाऊ देत नाही. घरातल्या गोष्टी घरातच राहतात.विशेषतः खेडेगावांमध्ये हे जास्त पाहायला मिळते.” तमारा म्हणते,”आमच्याकडे गणतंत्र राज्य आहे, पण गणतंत्र म्हणजे काय हेच समाज अजून जाणत नाही.”मिडिया व tv वर स्त्रीविषयक कार्यक्रम नाहीत असे नाही, पण बरेचसे कार्यक्रम ‘स्त्री आपल्या घराची चौकटच कशी सांभाळत बसेल’ याचा विचार करूनच दाखवले जातात.
आज अंतर-राष्ट्रीय खेळांमध्ये भरपूर गोल्ड मेडल्स मिळवणाऱ्या मुली आहेत,ऑस्कर फॉर क्लासिकल म्युझिक घेणारी अन्जेला जॉर्ज आहे, आंतरराष्ट्रीय यशासाठी २०११ चे युरोपियन बॉर्डर ब्रेकर अवार्ड घेणारी पॉप सिंगर एलेना अपोस्तोलीनू आहे,
‘If you want something said, ask a man , if you want something done, ask a woman!’ या श्रीमती मार्गारेट थाचरयांच्या उक्तीची आठवण करून देणारी ‘fortune 50 International most powerful women’ मध्ये झळकणारी- रोमानियातील सर्वात मोठ्या कंपनीची CEO – मारियाना जॉर्ज आहे!
मोठ्या शहरात स्त्री मेयर्स आहेत,राजकारणात मोठ्या पदांवर स्त्रिया आहेत,सन २००० मध्ये सिनेट वर फक्त दोन स्त्रिया होत्या आणि पार्लमेंट मध्ये ५.५% . पण आता ही सांख्य वाढते आहे. पण युरोपियन युनियनचा ३०% कोटा अजून फार दूर आहे.
आजचा रोमानियन तरुण बदलतो आहे,शहरात पुरुष स्त्रीला घरात निम्मानिम मदत करू लागला आहे. असं २५-२६ वर्षाच्या ख्रिस्तिना, वाना यांसारख्या तरुणी सांगतात.

पहिल्या जागतिक महायुद्धाच्या आधीपासून ते दुसर्या महायुद्धापर्यंत स्त्रीचे कार्यक्षेत्र घर- मुलेबाळे इथपर्यंतच मर्यादित होते. खेड्यात स्त्रीला शेतीची कामे करावी लागत.
दुसर्या महायुद्धानंतर कम्युनिझम च्या काळात स्त्रियांना बाहेर पडून काम करावेच लागले.परंतु त्यांच्या पर्स मध्ये आता काही कमाई होती. त्यामुळे आलेल्या स्वातंत्र्याची लज्जत थोड्याफार प्रमाणात चाखता येत होती.यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्की वाढला असणार. याच काळात शिक्षण सर्वांसाठी मोफत सुरु झाले आणि अगदी खेडोपाडी देखील शाळा सुरु झाल्या, याचाही फायदा स्त्रियांनी घेतला असणार !१९८९ च्या क्रांतीनंतर पब्लिक सेक्टर मध्ये जरी स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जात होती, तरी प्रायव्हेट सेक्टर्स मध्ये त्यांच्या कार्यकुशलतेची दाखल घेतली गेली आणि इथे खर्या अर्थाने रोमानियन स्त्रीची प्रगती सुरु झाली असे दिसते.
भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून राजा राम मोहन राॅय, रविन्द्रनाथ टागोर, ईश्वरचंद्र विद्यासागर, माधवराव रानडे , टिळक, आगरकर वगैरेंनी समाज सुधारणेचे कार्य हाती घेतले त्याबरोबरच स्त्रियांच्या शैक्शणिक प्रगतीसाठीही प्रयत्न सुरू झाले.धर्म, जाती व शिक्शण याबाबत या लोकोत्तर पुरुषांनी सुधारणा घडवल्या. जिथे बदलण्याची गरज होती, तिथे त्यांनी समाजाची मानसिकता बदलली, हे मोठेच कार्य ! आणि त्यांच्या बरोबर स्वर्णकुमारी देवी, रमाबाई सरस्वती, रमाबाई रानडे, मालती पटवर्धन, सरोजिनी नायडू या स्त्रियांनी हे काम पुढे नेले.
फक्त ५०% समाजाला म्हणजे स्त्रियांना परिस्थितीत बदल व्हावा असं वाटण पुरेस नसतं, परिस्थिती बदलवण्याला ते कारणीभूत होताच असं नाही.भारतामध्ये स्त्री मुक्तीसाठी केलेल्या सुधारकांच्या प्रयत्नांना हातभार लावण्याचे काम स्त्रीने केले असे दिसून येते.तरीसुद्धा खेड्यापाड्यात आजही खर्या अर्थाने स्त्री परंपरेच्या जोखडातून मुक्त झाली आहे का, हा प्रश्न राहतोच !
स्वतंत्र रोमानियात असे दिसते कि त्यांना एक जागरूक नागरिक बनण्यासाठी स्वतंत्र रोमानियाचे सुंदर स्वप्न पाहणारा समाज आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणारा नेता मिळाला नाही. याचे कारण कम्युनिझमच्या काळातच समाजातले विचारवंत तुरुंगात टाकले गेले, किंवा देश सोडून निघून गेले. आजही उच्चशिक्षितानचा काल देश सोडून जाण्याकडे दिसतो.
इथे रोमानियन स्त्रीचा झगडा स्वतःसाठी खर्या अर्थाने एकटीचाच आहे , कारण कम्युनिझमच्या काळात नागरिकांची वैयक्तिक मालमत्ता सरकारजमा होऊन सर्वांना राहायला सरकारी घरे, समान पगार, सारखे जेवण-खाण ! या सिस्टीमचा इतका धसका रोमानियन नागरिकाने घेतला आहे, कि जो तो स्वतः पुरतेच पाहतो. म्हणजे आपलi ओनरशिप flat अगदी स्वच्छ व सुंदर सजवलेलi असतो , पण घराबाहेरचा कॉमन जिना स्वच्छ करण्याची जबाबदारी कोणीच घेऊ इच्छित नाही कारण ती कॉमन property आहे. अशा मानसिकतेचा परिणाम म्हणून स्त्रियांनी एकत्रित होऊन स्वतःच्या प्रगतीसाठी पाऊल पुढे टाकणे रोमानियन स्त्रीला शक्य होत नाही.आणि ही मानसिकता बदलण्यासाठी ज्या नेत्याची गरज आज रोमानियाला आहे, त्याची चाहूल दूरदूर पर्यंत लागत नाही.तरीही सर्व शक्तीनिशी रोमानियन स्त्री आपल्या प्रगतीसाठी झटते आहे असेच चित्र इथे दिसते. पण या मुठभर स्त्रियांची प्रगती म्हणजे सर्व रोमानियन स्त्रियांची प्रगती असे सरसकट विधान करता येत नाही.खेड्यांमध्ये आजही ८ वी च्या पुढचे शिक्षण मिळू शकत नाही व शहराच्या गावी मुलांना शिक्षणासाठी पाठवायचे तर राहणे-खाणे व इतर खर्च करणे पैशांच्या अभावी शक्य नाही.काहींना मुलांच्या शिक्षणाचे महत्व काय आहे, याचीच अद्याप समाज नाही.
जो आत्मविश्वास आज भारतीय स्त्री मध्ये दिसतो, तो सर्व-सामान्य रोमानियन स्त्री मध्ये नाही कारण पुरुषसत्ताकपद्धत हे एक आणि वर्षानुवर्षे कम्युनिस्ट नेत्यांनी आपल्या हाती घेतलेले निर्णयाचे अधिकार.तरी शहरी तरुण पिढीत स्त्री व पुरुष दोघेही हातात हात घालून चालताना दिसतात. घर स्त्रीच्या मालकीचे कि पुरुषाच्या याचा विचार न करता रोमानियन स्त्री परस्पर विश्वास व प्रेम हा सुखी जीवनाचा पाया समजून लग्न करते आणि पुरुष घरातल्या जबाबदार्या वाटून घेतो, स्त्रीच्या करियर साठी प्रसंगी नोकरी बाजूला ठेवून मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेतो हा बदल नक्कीच आश्वासक आहे !

उज्वला अन्नछत्रे
बुखारेस्ट .

Monday, February 4, 2013

रोमानियन स्त्रीचे जागतिक स्तरावरील स्थान. 1

१९७६ मध्ये पहिल्यांदाच घरातल्या tv वरून मोंट्रियल येथील ऑलिम्पिक खेळांचं प्रसारण पाहताना अंगावर रोमांच आले होते !
आणि त्यातही ‘अनईव्हन बार्स’चा डोळ्याचं पारणं फेडणारा performance-एका छोट्या –केवळ १४ वर्षांच्या मुलीचा !
जजेसनी तिला ‘परफेक्ट टेन’ दिले होते !
नव्या ऑलिम्पिक- जिम्नॅस्टिक्सच्या इतिहासात हे पहिल्यांदाच झालं होतं ! पूर्वापार ऑलिम्पिक स्कोअर-बोर्ड बनवणार्या ‘ओमेगा एस ए ‘ नेया खेळांआधी जेव्हा विचारलं कि ‘४ डीजीटस लागतील का स्कोअर-बोर्ड वर ?’ तेव्हा त्याला उत्तर मिळालं होतं , ‘परफेक्ट टेन’ मिळण कधीही शक्य नाही ! छोट्याशा ‘नादिया कोमानिच’ चे मार्क त्यामुळे १०.०० असे दिसण्या ऐ वजी जगाला 1.०० असे दिसले! प्रेक्षकांना काही कळेचना पण लगेच लक्षात येऊन त्यांनी सर्वांनी उभे राहून छोट्या नादियाला मानवंदना दिली .
ही नादिया कोमानिच ‘ऑलिम्पिक ऑल अराउंड’ टायटल जिंकणारी पहिली रोमनिअन होती आणि आत्तापर्यंतची जिम्नॅस्टिक्स ची सगळ्यात लहान ‘ऑल अराउंड’ !
टेलीविजन प्रोग्राम मध्ये तिच्या performance च्या स्लो मोशन बरोबर ‘कॉटन ड्रीम’ या ‘ब्लेस द बीस्टस एन्ड चिल्ड्रन’ या सिनेमातील गाण्याचा instrumental piece वाजवला गेला . त्यानंतर या गाण्याचे नाव बदलून ‘नादियाज थीम” असे ठेवले गेले ! ही १९७६ ची ‘बिबिसी स्पोर्ट पर्सनालिटी ऑफ द इयर’ , असोसिएटेड प्रेस ची ‘athlete of the year’ , U P I ‘female athlete of the year’ जेव्हा रोमनियात परतली , तेव्हा ‘हिरो ऑफ सोशालिस्त लेबर’ म्हणून स्वतःच्या देशात गौरवली गेली . यावेळी रोमानिया चे अध्यक्ष होते ‘निकोल चाऊशेस्कू’ . तिथून पुढे ऑलिम्पिक गेम्स पाहताना दरवेळी रोमानिया ची खेळाडू आली , कि आमची उत्कंठा वाढत असे आणि रोमानियन स्त्री खेळाडूंनी आमची कधीही निराशा केली नाही !
रोमनियात अरुणच्या नोकरीच्या निमित्ताने प्रत्यक्ष जाऊन रहाण्याची संधी मिळाली , तेव्हा ह्या आधीच्या ‘सुपरिचित रोमानिया’ला जवळून पाहण्याची संधी मिळाली . तेव्हा गेल्या १००/१५० वर्षातील रोमानियाचा इतिहास आणि रोमनिअन स्त्रीचे जागतिक स्तरावरील स्थान जाणून घेण्याचा मोह होणे स्वाभाविकच होते.
बुखारेस्त राजधानिच शहर असलेलं रोमानिया युरोप मधील दक्षिणी पूर्वेकडील छोटेसे राष्ट्र .रोमानियाच्या एका बाजूला black sea आहे . पशिमेला हंगेरी आणि सर्बिया , उत्तरपूर्व आणि पूर्वेकडे युक्रेन आणि मोल्दोवा ही राष्ट्रे आणि दक्षिणेकडे बल्गेरिया . तेल, natural gas, लोखंड, कोळसा , तांबं आणि bauxite या नैसर्गिक संपत्तीने समृद्ध रोमानिया २० व्या शतकाच्या सुरुवातीपासून पहिल्या जागतिक महायुद्धापर्यन्त खूप श्रीमंत राष्ट्र म्हणून ओळखले जात होते . रोमानिया हे युरोप मधील पहिले राष्ट्र रस्त्यांवर लाईट्स असलेलं ! रोमानिया च्या आर्थिक प्रगतीचा आलेख चढता होता.रोमानिया त्या काळात छोटे paris म्हणून ओळखले जात असे . भौगोलिक रित्या अगदी मध्यावर असल्यामुळे दोन्हीही जागतिक महायुद्धांमध्ये रोमानिअला इच्छा नसताना सहभागी व्हावे लागले . रोमानियाचा इतिहास खडतर आहे . सुपीक जमीन , black sea , danube नदी यांमुळे बऱ्याच राष्ट्रांना रोमानिया सर करण्याची इच्छा होती . त्यामुळे या देशावर सतत युद्धे लादली गेली. जर्मन्स व रशियन्सनी महायुद्धांच्या काळात हा देश व्यापला .दुसर्या महायुद्धानंतर या राष्ट्रावर कम्युनिझम लादला गेला . ‘बोल्शेबिक सिस्टिम’ राबवली गेली.
पूर्वापार परंपरेनुसार स्त्रियांनी घरसंसार सांभाळणे ,मुलांना वाढवणे आणि पुरुषांनी बाहेर काम करून पैसे मिळवणे असे श्रमविभाजन होते . स्त्रीला घरात संरक्षण आणि आदर होता . जाणीवपूर्वक आणि अजाणता स्त्री पुरुष सुख दुक्खाचे समान भागीदार होते .
श्रीमंती जाऊन देशाला विपन्नावस्थेला तोंड देण्याची वेळ यावी इतपत परिस्थिती बदलली , ती दुसर्या महायुद्धाच्या व नंतरच्या काळात. १९४७ मध्ये कम्युनिस्टiनी किंग मिशेल –पहिला याला रोमानिया सोडून पळून जायला भाग पाडले . रोमानिया स्वतंत्र गणराज्य म्हणून घोषित केले गेले. आणि रशियाच्या मिलिटरी आणि आर्थिक सत्तेखाली राहिले, ते १९५० पर्यंत . या काळात रशियाने रोमानियाच्या राष्ट्रीय संपत्तीचा ओघ Moscow कडे वळवला . १९५८ नंतर रोमानियाचा नवा अध्यक्ष होता निकोल चाउशेस्कू .
देशातील या प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत असताना रोमनिअन स्त्री खचून न जाता जागतिक पातळीवर पाय रोवून उभी होती रोमानियाचा झेंडा फडकवत.१९३७ ते १९६० पर्यंतची कारकीर्द झळाळत ठेवली होती ‘अन्जेलिका रोझिनू’ या रोमनिअन टेबल टेनिस प्लेयर नी ! टेबल टेनिस खेळाच्या इतिहासात सर्वात यशस्वी टेबल टेनिस महिला खेळाडू म्हणून अन्जेलिका चं नाव घेतलं जातं world championship मध्ये १७ गोल्ड मेडल्स मिळवण्याचा पराक्रम करणाऱ्या रोझीनूने इतर १२ मेडल्स (सिल्वर व ब्राँझ )मिळवली .युरोपिअन championship मध्ये ६ मेडल्स तिने रोमानिया ला मिळवून दिली. निकोल चाउशेस्कू रोमानियाचा अध्यक्ष असताना –ज्यावेळी रोमानियात कम्युनिझम राबवला जात होता , त्यावेळी पहिल्यांदाच स्त्रियांना घराबाहेर पडून काम करण्याची सक्ती झाली . आणि स्त्री – पुरुष समानता रोमनिअन स्त्रीवर लादली गेली . एका INTERNATIONAL बँकेची manager फ्लोरेन्सा म्हणते ,”पोलिसांना जर सुगावा लागला कि एखादी स्त्री नोकरी न करता घरात बसून आहे , तर ते लगेच घरी येऊन कागद पत्रे मागत . नोकरीची कागदपत्रे न मिळाल्यास पकडून तुरुंगात डांबले जाई ! परंतु नोकरी देताना तिच्या शेक्षणिक व इतर पात्रतेची दाखल न घेताच सरसकट ‘कामगार वर्ग’ मानून काम दिले जाई.फ्रेंच व इंग्रजी भाषेची प्रोफेसर असलेली तमारा म्हणते,”१९७५ -७७ पर्यंत तरीही परिस्थिती इतकी वाईट नव्हती .लोकांकडे पैसे जास्त नव्हते , कारण पगार अतिशय कमी .अन्न-धान्य तरीही मिळत असे .परंतु बाहेरच्या जगात काय चालले आहे याची सुतराम कल्पनाही आम्हाला नसे .national tv हे एकच चानेल संध्याकाळी ७ते९ असे दोन तास पाहायला मिळे. त्यावर दाखवले जाणारे कार्यक्रम व बातम्या sensor केलेल्या असत. सरकारी सूचना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे साधन म्हणून मुख्यत्वे tv चा वापर होई . छोट्या मुलांसाठी कार्टून्स दाखवली जात. देशाबाहेर जाण्याची सामान्य नागरिकांना परवानगी नसे. व जे ०.५%लोक परदेशी जाऊ शकत, त्यांनाही फक्त कम्युनिस्ट देशातच जाण्याची परवानगी असे. पण या काळातही जगासमोर मiन उंचावून रोमनिअन स्त्री उभी होतीच !

क्रमशः

....पक्शी.....


हा देखणा , शुभ्र पक्शी...
घेऊन आलेय् , माझ्या जन्माबरोबरच मी.
ही माझी स्वप्नवत् अलौकिक ठेव.

दर इच्छेगणिक या पक्शाचा
एकेक कण
अलग होतोय .... त्याच्यापासून

ही पुन्हा एक इच्छा......
हे पक्शातल्या आणखी एका
कणाचं पडून जाणं....माझ्या नकळत

आता इच्छांची विवरं मोठी होत चाललीयत्
......

आता मी....मी ? कि इच्छांचं अंतहीन विवर ?
आणि ..पक्शी......?

Sunday, February 3, 2013

एअर पोर्ट


मार्च २७ , १९९२ ! माझा पहिला परदेश प्रवास ! अरुणच्या नोकरीच्या निमित्ताने आम्ही भारत सोडून निघालो होतो परदेशी वास्तव्यासाठी . उत्सुकता , काळजी , थोडी भीती आणि खूप सारा आनंद होता या प्रवासात . ९ तासांचा विमानप्रवास – तोही पहिल्यांदाच केलेला !पहिल्यांदाच झालेले आकाशातून मुंबापुरीचे आणि भारताचे रम्य दर्शन. आणि मग आकाशातून – ढगांतून केलेला मुक्त प्रवास !मी जणू तरंगत होते- मंतरलेल्या जगात !
हिथ्रो !जगातला सर्वात मोठा एअरपोर्ट ! हिथ्रो ला पाहिलं landing. सुंदर – सुखद हवा – हलकी पावसाची भुरभूर . तिथून Gatwick एअरपोर्ट ला पुढच्या विमान प्रवासासाठी जायचे होते – त्रिनिदाद- West Indies ला . Gatwick एअरपोर्ट वर मी लाउंज मध्ये बसले होते. अरुण कॉफी आणण्यासाठी गेला होता. तेवढ्यात माझ्याजवळ साधारण ६० वर्षे वयाची एक सुंदर अमेरिकन स्त्री येऊन बसली .तिने चटकन पर्समधून एक पुस्तक काढले व वाचू लागली . मी एअरपोर्ट वरच्या बाकी प्रवाशांकडे पाहत कोण –कुठल्या देशाचे असतील याचा अंदाज घेत होते.
एवढ्यात तिने माझ्याकडे निरखून पाहिले आणि म्हणाली ,”you are Indian !” मी म्हटल हो, आणि तुम्ही कुठच्या ? “अमेरिकेची” हे बोलाताबोलातच तिने तिच्या हातातले पुस्तक मला दाखवले ! भगवद्गीता ! गीतेचे संस्कृत श्लोक आणि खाली इंग्रजीत भाषांतर . मी आश्चर्यचकित झाले .तोच ती सांगू लागली ,” मी गेली ५ 1/२ वर्षे हिमालयात राहत होते .तेथे एका गुरूंकडे ( नाव माझ्या लक्षात नाही ,पण ती अतिशय आदराने त्यांचा उल्लेख करत होती .) शिकले . मी रोज भगवद्गीता वाचते .आता अमेरिकेला जायला निघाले आहे. मग व्यास लिखित महाभारतातील भगवद्गीतेवर आम्ही चर्चा केली. एम ए ला नुकताच ज्ञानेश्वरीचा अभ्यास झाला असल्याने आणि लहानपणापासून काही अध्यायांचे नियमित पठन असल्याने चर्चा रंगली . एका तासाने तिच्या flight ची announcement झाल्यावर ती निघाली ,तेंव्हा तिच्या डोळ्यात आनंद होता , "भारताबाहेर एक 'तिची 'भारतीय भेटल्याचा." पुन्हा पुन्हा माझा हात हाती घेऊन ती तो आनंद व्यक्त करत होती !आणि मी – आपला भारत सोडून जाताना पहिल्याच विमान तळावर तिला भेटले होते , जिने मला –माझ्या भारताला आधीच आपलसं केल होतं ! नव्या जगानी केलेलं माझं पहिलं स्वागत , भारतीयत्वाचा सन्मान आणि आपलेपणा यांनी मी भारावून गेले .
british airways ने आम्ही त्रिनिदाद ला पोहोचलो. तिथे भारतीय असल्याने अतिशय आदराने व प्रेमाने आम्हाला रिसीव्ह केले गेले. बाहेरच्या बाजूला आल्यावर एकजण ( जो बर्याच अंशी भारतीय असावा असे वाटले ) आमच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, “तुम्ही सुनील गावस्कर च्या देशातले –भारतातले न? आम्हाला सुनील गावस्करचा खेळ अतिशय आवडतो . सुनील गावस्कर सार्या वेस्ट इंडिअन्स चा अतिशय आवडता खेळाडू आहे!”
भारता बाहेर पडताना नव्या जगाशी- नव्या देशाशी आपल्याला जुळवून घ्यायचे आहे . कशी असतील अनोळखी देशातली माणसे ? कसे जमेल आपल्याला तिथे राहणे ? नाना अडचणी असतील –अशा अनेक शंका ! आणि एअरपोर्ट वरच सारे त्रिनिदादच जणू आपले –सुनील गावस्करच्या देशातल्या व्यक्तींचे –केवढ्या आपुलकीने , प्रेमाने स्वागत करत आहे, असा अनुभव !
पुढे साडेतीन वर्षांचे आमचे तिथले वास्तव्य अनेक अर्थांनी संस्मरणीय झाले . तिथल्या लोकांशी – मातीशी - सौहार्दाचे संबंध जुळले .तिथल्या सुंदर बीचेस वर अनेक ट्रिप्स-पिकनिक्स –झाल्या .वर्षातले १२ ही महिने हिरव्या असणाऱ्या झाडांचा हा देश आमच्या मनामध्ये कायमचा वस्तीला आला. निघताना आमच्या एका स्नेह्यांच्या वडिलांनी आम्हाला आशीर्वाद देताना म्हटले होते,”वेस्ट इंडीज चे बेस्ट इंडीज करून या “ तो आशीर्वाद फळाला आला !