Wednesday, January 30, 2013

गणेशोत्सव-बुखारेस्टमधला !


"अगं मारिया, उद्या अनंत चतुर्दशी. दयाळ काकान्कडे जायचंय उद्याचे नैवेद्याचे मोदक करायला. येतीयेस ना?" माया फोन वर आपल्या चेक मैत्रिणीशी बोलत होती (चेकोस्लोवाकिया ह्या देशाचे स्लोवाकिया व चेक रिपब्लिक असे विभाजन झाले.)

"आटोपलं आहे माझं, माया. आता निघतेच आहे. मोदक झाल्यावर मुलींना शाळेतून आणायला जाऊ." असं म्हणत मारियाने रिसिव्हर ठेवला. बुखारेस्टला आल्या पासून गेली चार वर्षे ती नैवेद्याचे मोदक करायला दयाळ काकांकडे जात असे.

आपल्या स्वच्छ चमकणाऱ्या आणि कलात्मकतेने सजवलेल्या घराकडे नजर टाकून मारिया घराबाहेर पडली आणि कुलूप घालून रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या मायाच्या घराकडे निघाली. मायाच्याच बिल्डींग मध्ये दयाळ काकांचे घर आहे. राम कुमार आणि प्रमोद अडवानी- माया व मारियाचे पती ज्या कंपनीत काम करतात, त्या कंपनीचे मैनेजर दयाळ काका. गेली १७ वर्षे दयाळ काका रोमानियातील बुखारेस्टला गणेश उत्सव साजरा करत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव! श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्यांच्याच घरी अस्ते. गणेश चतुर्थीला वाजत गाजत श्रीगणेशाची पूजा आणि प्राणप्रतिष्ठा होते. तेव्हा दरवर्षी तेवढ्याच प्रेमाने आणि भक्तीने दयाळ काकांचे मन गहिवरते.

ह्या वर्षी श्रीगणेशाची मूर्ती मारिया वप्रमोदने पुण्याहून आणली होती. मुंबई-दुबई-तुर्की-बुखारेस्त अश्या प्रवासात एखाद्या छोट्या बाळाप्रमाणे सतत हातावर धरून मारिया-प्रमोदने ती मूर्ती दयाळ काकांकडे पोहोचवली. दर वर्षी भारत किव्वा लंडनहून दयाळ काका शाडूची श्रीगणेशाची मूर्ती मागवतात.

माया, मारिया, वियोरिका, मरिनेला आणि तमिळनाडचा राजेश यांनी बसून २८० मोदक केले. दयाळ काकांची रोमानियन कूक, ऑन्त एलेना तळण्यासाठी सारा वेळ उभी होती आणि प्रत्येक मोदक एकाच आकाराचा, तितकाच व्यवस्थित होतोय कि नाही याकडे नजर ठेवत दयाळ काकाही मदतीला जातीनं होतेच."खरं तर ३५० मोदक व्हायला हवेत." परंतु २८० मोदकांन नंतर सारण संपले व नाईलाजाने दयालकाकांनी "ठीक" म्हटलं.

दयाळ काका आता ७५ वर्षाचे आहेत. ४ वर्षान पूर्वी वाधवानी काकू गेल्या. त्या हि दयाळ काकांसारख्याच प्रेमळ होत्या, मारियाच्या मनात आलं! आज माया मारिया ला जेवायचीही फुरसद नव्हती. मोदक झाल्यावर फ्रेश होऊन त्या घाईने केम्ब्रिज स्कूल ऑफ बुखारेस्टला मुलींना आणण्या साठी निघाल्या. मुलींना नंतर तयार करून, कुहू ह्या त्यांच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला संध्याकाळी ५ पर्यंत पोहोचायचे होते.

एकता चौधरी कडे कुहूच्या वाढदिवसासाठी मी व चैतन्याही{ माझी १२वितलि मुलगी ] होतोच! मारिया चेक रिपब्लिकची. जगातल्या सर्वात सुंदर शहरांपैकी २ नंबर वर असलेल्या 'प्राग मधली! मीही चेक रिपब्लिक मध्ये 'ओस्त्रावा' येथे राहिलेली .त्यामुळे मला मारिया बद्दल जणू आपल्याच देशाची मैत्रीण असावी अशी आपुलकी आणि मारियाच्या प्रागला ;तिच्या माहेरी जाऊन आलेली मी म्हणून तिला माझ्याबद्दल एक विशेष ओढ असे.
आल्या आल्या तिने मला मोदाकांबद्दल सांगितले . मोदक झाले व तेही आमच्या चेक व रोमानिअन मैत्रिणींनी केले हे ऐकल्यावर मी थक्कच झाले!
यावर्षी मायाचा फोन आला आणि बुखारेस्टला सार्वजनिक गणेशोत्सव होतो हे मला पहिल्यांदाच कळले. मलाही बुखारेस्टला येऊन वर्ष झाले होते आणि नव्या ओळखी-मैत्रिणी होईपर्यंत गणेशोत्सव होऊनही गेला होता गेल्या वर्षीचा! "उज्वल, अगं, माझ्या घाराशेजाराच्याच फ्लेट मध्ये गणेशोत्सव साजरा होतो . दहाही दिवस आरती प्रसाद व जेवण असते.जितके दिवस शक्य आहे तितके दिवस आरतीला व प्रसादाला जरूर यायचं .दयाळ काकांच्या वतीने हा निमंत्रणाचा फोन. आणि विसर्जनासाठी तुमची उपस्थिती खूप महत्वाची ."
घरगुती स्वरूपात साजरी होणारी भाद्रपद शुक्ला चतुर्थी-गणेश चतुर्थी १८९३ साली टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्वरूपात सुरु केली ती समाजाने एकत्र यावे ,वेगवेगळ्या विषयांवर बौद्धिक चर्चा , भाषणे, काव्यवाचन, गाणी असे कार्यक्रम वावेत आणि राष्ट्रांतर्गत एकता प्रस्थापित व्हावी या दृष्टीने .
भारतात महाराष्ट्र, गोवा, आंध्र, कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू आणि छत्तीस गड येथे गणेशोत्सव होतो.भारताबाहेरही अमेरिका, केनडा, मोरीशास सिंगापूर आदि ठिकाणी महाराष्ट्रीय मंडळांनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाबद्दल पहिले ऐकले आहे. पण पूर्व युरेपातील रोमानिया हे छोटेसे राष्ट्र!इथे महाराष्ट्रीय मंडळही नाही. किंबहुना एखाद-दोनच महाराष्ट्रीयन कुटुंबे येथे सापडतील! इथे सार्वजनिक गणेशोत्सव! ऐकून मी फारच आनंदले!
गेली वीस वर्षे आमचे वेगवेगळ्या देशात वास्तव्य असले तरी प्रत्येक ठिकाणी आमच्या घरी गणपती बसतात आणि कंपनीतील भारतीयांसाठी या दहा दिवसात रोज संध्याकाळी आरती प्रसादासाठी बोलावणे असते. वीकेंडला तर सकाळची आरतीही सार्वजन मिळून करतो. अनंत चादुर्दशीला सर्वांसाठी जेवणात मोदकांचा बेत ,असतोच.मोठ्या प्रेमाने वेगवेगळ्या भाषेतल्या आरत्या, संस्कृत -मराठी स्तोत्रे, भजने, गणपती अथर्वशीर्ष आणि आरती होते.भक्ती-प्रेमाच्या धाग्याने सार्वजन एकमेकांशी बांधले जातात आणि एका वेगळ्याच पवित्र वातावरणाने सर्वांची माने भारावून जातात.
सध्या माझे पती अरुण हे रोमानियातील गलात्स ला असतात ते गाव बुखारेस्तपासून {रोमानिआची राजधानी} पासून ३ तासांच्या अंतरावरचे. गालात्सला आमच्याकडे गणपती असतात. पण चैतन्याच्या शिक्षणाच्या निमित्ताने बुखारेस्टला राहायला आलेली मी रोमानियातील गणेशोत्सवाबद्दल ऐकून सुखावले.

मनेश वाधवानिचे निमंत्रण मला फेसबुकवर मिळालं. हे निमंत्रण रोमानियन व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत होतं. रोमानियन लोकांना आपले आराध्य-दैवत श्रीगणेश व गणेशपूजेचे महत्व कळावे म्हणून खास रोमानियन भाषेत मनेशनी एक सुंदर लेखही लिहिला आहे. गणेशाचे चार हात, त्याची आयुधे, - तो लंबोदर का आणि उंदीर या वाहनाचे महत्व व माहिती करून देणारा इंग्रजी भाषेतील लेखही मनेशच्या साईट वर आहे. आपल्या संस्कृती व संस्कारांची माहिती त्यात आहेच, पण मधून-मधून गणपतीबाप्पान्वरची क्लिपिंग्ज फेसबुक वर टाकून या उत्सवाची रंगत कायम ठेवण्याची किमया साधली आहे. त्यापैकी एक क्लिपिंग:
पार्वती: गणू बेटा, तुला खरं तर जिम सुरु करायला पाहिजे.
गणपती: गणपती: मी काही जाड नाहीये !uu
पार्वती:पण तू तुझ्या बाबांसारखा अधिक फिट होशील.
गणपती:परत परत नको सांगूस ग आई!असू दे !आणि तरीही मी सर्वांचा लाडका आहे.
पार्वती: ते हि खरच! माझं बाळ ते!
गणपती: आई ग, आता १० दिवस नसेन मी इथे.मी चाललो फूड फेस्टिवल ला. भक्त, मित्र, माझे चाहते यांच्याकडे स्वादिष्ट भोजन, लाडू व मोदकांचा आस्वाद घ्यायला!
आणि हो, हनुमान जर माझ्यासाठी नव्या जिम ची मेंबर शिप ऑफर घेऊन आला तर म्हणावं- जमणार नाही!
गणपती बाप्पा मोरया!!!!

इथे आरती साठी ७:४५ ची वेळ दिलेली असते.सर्वजण आपापल्या कामांवरून घरी येऊन सहकुटुंब आरतीसाठी दयालकाकांकडे पोहोचतात. ज्या ज्या दिवशी शक्य असेल, त्या त्या दिवशी आणि शक्य असेल तितक्या लोकांनी दयाळ काकांकडे आरतीला जायचे. फक्त आधी फोन वरून सूचना द्यायची.(प्रसाद व जेवणाची व्यवस्था नीट व्हावी,यासाठी!) मी व अरुण श्री दयाळ वाधवानी यांच्याकडे पोहोचलो. इंटरकॉम वरून हलो म्हणताक्षणीच दरवाजा उघडला गेला. तिथे जमलेल्या सर्वांनी आमचे स्वागत केले.दयाळ काकांची ओळख करून दिली. पूजेनंतर बोलताना सर्वजण आवर्जून माहिती देत होते. विसर्जन "हेरास्त्राउ लेक " मध्ये आहे.त्याचा पत्ता, कुठल्या गेट पाशी गाडी घ्यायची, असे सर्व. त्यांच्याच गाडीने आम्ही जावं असा आग्रहही बर्याच जणांनी केला. मी मधेच अरुणला मराठीतून म्हटले,'प्रसाद देताहेत तुला.' ते ऐकताच विजय कृष्णन , प्रमोद अडवानी वगैरेंनी आमच्याशी मराठीतूनच बोलायला सुरुवात केली. विजय म्हणाले, गेली १०० वर्षे आम्ही कृष्णन कुटुंबीय मुंबईत राहत आहोत. आम्हाला मराठीची अस्मिता आहे. रुईयात शिकलो आहे. लहानपणापासून मराठी पुस्तके वाचतो. प्रमोद म्हणाले, माझी बहिण पुण्याला असते .आणि या अमराठी मंडळींबरोबर आमची मराठी मैफल रंगली!.
दयाळ काकांशी बोलताना मी विचारले,"दयालकाका, तुमच्याकडे गणपती बसवण्याची प्रथा कधीपासून ची?" माझं मुलगा मनेश याच्या जन्मापासून आम्ही गणपती बसवायला लागलो.आम्ही पुण्याचे. केम्प भागात राहणारे. त्यामुळे गणेशोत्सवात दरवर्षी पूजा, डेकोरेशन , कार्यक्रम ठरवणे यात सहभाग पूर्वीपासून होताच."
मनेश शी यावर बोलताना ते म्हणाले,"माझ्या जन्मापासून म्हणजे गेल्या ३३ वर्षांपासून घरी गापती बसतात. आम्हा सर्वांची श्रीगणेशावर फार श्रद्धा आहे.आम्ही दरवर्षी गणेश चतुर्थीची अगदी आतुरतेने वाट पाहतो. भारत असो कि रोमानिया, जिथे असू तिथे हे १० दिवस आमच्याकडे गणपती बसतातच.पुण्यात गणपतीच्या मूर्ती बाजारात यायला सुरुवात झाली,कि आम्ही लगेच बाजारात जाऊन आपल्या पसंतीची मूर्ती बुक करतो.सजावट करणे हा हौसेचा भाग असला तरी आपले आराध्य दैवत खरेच घरी येणार असेल तर ज्या भावनेने आपण घर सजवू, त्याच भावनेने आम्ही घरी सजावट करतो. हे दहा दिवस रोज सकाळ -संध्याकाळ पूजा,आरती असते.
'जय गणेश जय गणेश देवा",'ओम जय जगदीश हरे' आणि आमच्या कडच्या प्रत्येक पूजेच्या वेळी म्हटले जाणारे आम्हा सर्वांचे अतिशय आवडते भजन 'आशिष कर गुरु हे म्हटले जाते.आमचा सर्व मित्र परिवार व गोतावळा या पूजेत सहभागी होतो.प्रसाद बनवण्याची जबाबदारी आळीपाळीने घेतली जाते.अनंत चतुर्दशीच्या दिवशी नैवेद्य म्हणजे तळणीचे मोदक.आई मी व माझ्या बहिणी बसून ४००-६०० तळणीचे मोदक बनवायचो. विसर्जनाला नदीवर येणाऱ्या प्रत्येकाला हा प्रसाद मिळे.विसर्जनाच्या दिवशी आमची माने जड होतात. पण त्यातली आनंदाची गोष्ट म्हणजे श्री गणपती त्यांच्या आईकडे -पृथ्विमातेकडे परत जातात , ते पुढच्या वर्षी पुन्हा परत येण्याचे वाचन देऊनच.
कुणाला प्रश्न पडेल,हा उत्सव, हि मूर्तीपूजा करायलाच पाहिजे का?पण हे पवित्र वातावरण आणि सर्वांना एकत्रित येउन् काही आनंदाचे कण वेचण्याची संधी श्री गणपतींच्या आगमनानेमिळते व त्यामुळेच गणपती सर्वांचे आवडते दैवत आहे.
गणेशोत्सव आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे, जे लोक हा साजरा करतात, त्यांच्यासाठीही तो महत्वाचा आहे आणि तुम्ही जेव्हा तो साजरा करता, तेव्हाच त्याची महती तुम्हाला कळते. गणेशोत्सव हा आमच्या महान संस्कृतीचा एक मोठा भाग आहे."
"दयाळ काका, तुम्ही रोमानियात कधी आलात?"नोकरीच्या निमित्ताने १९९७ साली आम्ही रोमानियात आलो.आणि दरवर्षीप्रमाणे गणपती बसवण्याचे मनात ठरवले.शुभकार्याची कल्पनाच शुभकार्य घडवून आणण्यासाठी सहायक ठरते असे म्हणतात.१९९७ साली आमच्या मित्राने आमच्यासाठी भारतातून गणपतीची मूर्ती इथे आणली. त्यावर्षी इथले आमचे कुटुंब व कंपनीतील भारतीय यांनी या उत्सवात भाग घेतला.पुढे हळू हळू भारतीय एम्बसी तील कुटुंबे इथले रोमनिअन मित्र, व्यवसाय निमित्ताने झालेले परिचित यात सामील झाले आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेले बुखारेस्त व आसपासच्या शहर गावातील भारतीयही या उत्सवात सामील होऊ लागले.
आज शनिवार दिनांक ३० सप्टेंबर २०१२. आनंत चतुर्दशीचा दिवस! आज पहिल्यांदाच इथल्या गणेश विसर्जन सोहळ्यात सहभागी व्हायचे होते. चैतन्यi मी व अरुण जरा लवकरच तयार झालो होतो. माया , राम व अनुश्काही आले.
हेरास्त्राउ या बुखारेस्त च्या पार्क मध्ये मोठे लेक आहे. तिथे पोहोचलो तेव्हा भारतीय एम्बसी तील कुटुंबे, रोमनिअन मंडळी, बुखारेस्त व आसपासच्या गाव-शहरांमधील भारतीयही सरोवराजवळ जमले होते.दोन बोटी आधीच bookकेल्याने किनार्याला होत्याच.श्री गणेशाची मूर्ती घेऊन दयालकाका, मनेश आले.आणि आणखीही काही कुटुंबांनी आपापल्या घरी गणपती बसवले असल्याने त्यांचेही गणपती विसर्जनासाठी सरोवराजवळ'गणपतीबाप्पा मोरया,मंगलमुर्ती मोरया' च्या गजरात हेरास्त्राउ पार्क मधून बोटीवर दाखल झाले. मूर्तींसाठी आसन, आरास वगैरे तयारी बोटींवर आधी पासूनच होती. बोटी निघाल्या. सुरेश वाडकर, लता मंगेशकर आदींच्या भजनाबरोबर बरेचजण गणेश मुर्तींसमोर नाचत होते.मधूनच एक दोन तीन चार -गणपतीचा जयजय कार अशा आरोल्याही येत होत्या. सर्वांना गुलाल लावला गेला. दीपक महेश्वरी विनायक होसकोटे, पावन मेंघानी आदिन बरोबर रोमनिअन परीवारांपैकी काही जणयात सहभागी होते. त्यांचाही उत्साह चेहेर्यांवरून ओसंडून वाहत होता.
बोटी सरोवराच्या मध्यभागी येऊ लागल्या आणि पूजा, श्लोक सुरु झाले.अरुणने प्रणम्य शिरसा देवं म्हणायला सुरुवात करताच सगळीकडे शांतता पसरली.नंतर प्रत्येकाला आरती करायला मिळाली. शेवटी मंत्र पुष्पांजली झाली, तोवर बोटी मध्यावर पोहोचल्या. संध्याकाळचे ७:३० वाजले होते. एकेका मूर्तीचे विसर्जन होऊ लागले, आणि आम्हा सर्वांचीच माने भरून आली.एवढ्यात ओक्तावियान या रोमानियन तरुणाने आम्हाला १० दिवसांची पूजा व विसर्जन यांच्या ५ तासांच्या स्वतः केलेल्या रेकॉर्डिंग ची झलक दाखवली.
इकडे मनेश, त्यांचा मित्र परिवार, माझ्या मैत्रिणी माया, मारिया, कशिश वगैरेंनी महाप्रसादाच्या प्लेट्स भरायला सुरुवात केली खीर, गुलाबजाम, लाडू, इडली-वडा सांबर, मसाले भात, रायता, छोले ..वगैरे मोठा बेत होता आम्हा १००-१२५ लोकांसाठी.मधून-मधून पाणी,प्रसादाचे मोदक, फळे वगैरे फिरवले जात होते .
महाप्रसादानंतर बोटी माघारी फिरल्या .जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी आपण आपली संस्कृती जपतोच.आपले अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करतोच.पण आजच्या नव्या युगात जागतिक पातळीवर गणेश पूजेच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशातील लोक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करताहेत,चेक रिपब्लिकन , रोमानियन मुली एकत्र येऊन मोदक करत आहेत आणि त्यांच्या बरोबर आहेत भारतातील वेग-वेगळ्या प्रांतातील स्त्री-पुरुष! गणेश चतुर्थी पासून १० हि दिवस पूजा आरती यात सहभागी होताहेत भारतीय पेहेरावात हि परदेशी माणसे! विसर्जन सोहळ्याचा आनंद लुटत आहेत. पूर्व युरोपातील रोमानियाच्या बुखारेस्त मध्ये दिसणारंहे दृश्य पाहून मी स्तिमित झाले!
टिळकांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजाला एकत्र आणण्याच्या सुंदर परंपरेला सुरुवात केली आज जगाच्या पाठीवरील वेगवेगळ्या देशातील रहिवाशांना त्याच मैत्रीच्या भावनेने एकत्र आलेले पाहून भारावून गेले.
घरी निघताना पुन्हा नक्की भेटू वगैरे आश्वासानांबरोबर फोन नंबर्स इ मेल आय डी दिलेघेतले आणि रोमनिअन कुटुंबांनीही भेटीचा आनंद व्यक्त करून विजीतिंग कार्ड ची देवाण घेवाण करत नजीकच्या काळात होणार्या वेस्टर्न मुझिक कॉनसरत व ओपेराज ची निमंत्रणे दिली परतीच्या वाटेवर स्नेहाच्या-मैत्रीच्या या गोफात पृथ्वी वरची सारी मानसं गुंफली जातायत अशा विचाराभोवती माझं मन पुन्हा एकदा रुंजी घालायला लागलं!!!
उज्वला अन्नछत्रे
रोमानिया, बुखारेस्त.

No comments:

Post a Comment