Tuesday, January 29, 2013

कण

माझ्या डोळ्यात हा एक कण आहे .कुठेतरी ....
बाहेर काढता येत नाही तो .
आणि त्याला आपला एक ढग आहे..त्याच्या बरोबर हा माझ्यात
इकडे तिकडे हिंडतो.
मोठा होऊन येतो कधी ..
पुन्हा आपल्या स्वभावा  प्रमाणे सगळे पहातो, ऐकतोही.....
जरी तो त्याचा स्वभाव नाही.
कंटाळवाण्या दुपारी तो उठून चक्कर मारायला जातो.
कोपर्यावर थांबत नाही गल्लीच्या-
पुढे चालत रहातो .
माघारी येताना याचा ढग थोडा मोठा....पाणी भरलेला असतो.

त्याला वेड लागलय आता हिंडायचं.
दिवसेंदिवस जास्तच मोठा होत चाललाय तो.
मी त्याच्या बदलणाऱ्या रूपाकडे पाहते.
छान आहे की...म्हणते.

खूप दिवस मी त्याच्याकडे बघितले नाही.
तो पाहतोय....ऐकतोय.....छद्मीपणे.
मी चमकते......
पूर्वीपेक्षाही छोटा झालाय तो आता......
मला न दिसण्याइतका .....आणि आता फक्त 
जाणवते - त्याचे खुपणे !

No comments:

Post a Comment